समुद्र

(Note:- This post, in its entirety has been written in Marathi, an Indian language. And to my Overseas/ non-Marathi readers, here are the links to the posts which incorporate a crude version of this very post in English. Although, it’s on a different premise as it’s based on the protagonist of yet another of my post rightly named… Queen )

Pensive: The flaw

Pensive: A solution

आणि माझ्या मराठी बांधवांनो (आणि अर्थातच भगिनींनो…) चला! आपण आपल्या प्रवासाची सुरवात करूया.

खरं तर आज मला तुमच्यासमोर एक कविता सादर करायची आहे. हा लेख माझी कविता लिहिण्याचा दुसराच प्रयोग आहे. आणि मराठीत तर पहिलाच. म्हणून कृपया समजून घ्यावे!

कवितेला येथे साथ दिली आहे ती एका छोट्या कथेने. तुम्ही या कथेला कवितेची पूर्वपीठिका म्हटलं तरी हरकत नाही.

बरं. वायफळ बडबड पुरे झाली. आता कामाची गोष्ट ऐका.

समुद्र

समुद्रकाठी असताना ....
अनंत, अस्थिर आणि आकर्षक. हे जल आहे की आहे खरंच जीवन?

एक विचारू?” ती मला अगदी सहजरित्या म्हणाली.

आमचा त्या दिवशी अचानकच समुद्रकिनारी जायचा बेत बनला होता. आणि समुद्राकडे जायला आजवर मी तरी कोणाला कधीच नाही म्हटलं नव्हतं.

“विचार” मी म्हणालो.

“तू समुद्राकडे आल्यावर एवढा शांत का होतोस? म्हणजे, तसही तू शांतच असतोस, पण समुद्रकिनारी येताच तुझ्या चेहऱ्यावरचे भाव….. असं वाटतं की जणू तू काही गहन विचारात आहेस.” ती म्हणाली, आणि म्हणता म्हणाताच मला काळजीपूर्वक न्याहाळू लागली.

“तो तर मी नेहमीच असतो!” मी जरा मस्करीतच म्हणालो. परंतु, तिचा तो गंभीर चेहरा बघून मला जाणीव झाली की तिला माझं बोलणं काही पटलेलं नव्हतं. म्हणून, एक लांब श्वास घेत मी अखेर बोलता झालो.

“नाही पण, तसं सांगायला गेलं तर लहानपणापासूनच आमचं एक खास नातं जडलं आहे. म्हणजे, माझ्या लहानपणापासून. तो तर अनादी अनंतच आहे मुळी!” मी म्हणालो, आणि तिच्या चेहऱ्यावरची ती खळी पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला.

“समुद्रकिनारी येताच, अनेकदा मी त्याच्या लयीत तल्लीन होऊन जायचो. समुद्रात नक्की अशी काय जादू आहे, ते मात्र माझ्यासाठी एक गुपितच बनून राहिला होतं, आणि म्हणूनच मला ती गोष्टं कुठे तरी कायम खुपायची.”

खुपायची. किती आत्मविश्वासाने वापरला होता मी तो शब्द! आणि बहुदा तिनेही तो चटकन उचलला होता कारण तिच्या भुवया ते ऐकून लगेचच उंचावल्या.

“पण आज….. आज कोण जाणे का मला असं भासू लागलय कि जणू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. ते उत्तर खरं तर एक कल्पनाच आहे. जी म्हणजे:-

समुद्र हा निसर्गनिर्मित मानवी मनाचं सर्वात सुरेख प्रतीक आहे.

कसं?

अफाट पसारा असला जरी, तरी

कुठे दर्यांहुनही खोल, तर कुठे पाझरी.

मनाच्या क्षमतांची, मर्यादांची,

जणू दृष्यस्वरूपे दर्शवी.

.

कधी उंचावणारा, तर कधी खालावणारा,

जवळ येऊनही पुन्हा दुरावणारा.

मानवी भावना भासविणारा,

हा ‘भाव’-सागरच मुळी.

.

पण किनाऱ्याहून दुरी जाता,

मंद होई अंगाईगीतासारखा.

बाहेरून वाजणारा, आतून निजाणारा,

बदलुनही खरंच कधी न बदलणारा.

.

किंतु जेव्हा येई वादळवारा,

तेव्हा मार्गे सर्वनाश आणणारा.

भेदारलेला, भांबावलेला,

जणु आपल्याच विचलित मनासारखा.

.

तरी, वादळ असो वा असो वारा,

किनारी धाडणे हाचि त्याचा इरादा.

क्वचितच कोणाला सामावणारा,

नदी, वर्षालाही क्षाराविणारा.

.

जर समुद्र खरोखरच मनासारखा,

तर मग निष्कर्ष सहजसोप्पा.

बाह्यविश्व दुष्प्रभावी जेथे,

खरे काय प्रभावी तेथे?

किंबहुना याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या नादात मला माझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर सापडले, असे म्हणणे हरकत नाही. कारण मी समुद्राकडे याच कारणाने तर येतो. मनातल्या अनुत्तरित प्रश्नांची त्याच्यासमोर एक सांगड घालण्यासाठी.”

माझे ते बोलणे ऐकून ती माझ्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होती. आणि मी समुद्राकडे. सूर्याला तो अथांग महासागर गिळंकृत करणार तेवढ्यातच आमची नजर एक दुसऱ्याला मिळाली आणि एक सुंदर हसू दोघांच्या गाली पसरलं.

Seaface - समुद्रकिनारा

त्या क्षणी, माहित नाही का, पण मला असं वाटलं की जणू आमची मने त्या सागराने जिंकली होती. आणि वाटू लागलं की त्या दुर्मिळ त्रिवेणी संगमातून कधी बाहेर येऊच नये. तिथेच राहावं.

कायमचच.

8 Comments Add yours

  1. The Pensieve says:

    You are welcome! I am indeed grateful for your follow back and likes 😊✌️

    Liked by 1 person

    1. Dhanyavad Lokesh! 😊

      Like

Leave a comment